⭕अकलूज मधील गरीब फकिरांचे लाखो रुपये लुटून "चौधरी गँग" फरार ⭕"बुल कॅपिटल"च्या नावाखाली करोडोंचा डल्ला...
अकलूज (विशेष बातमी प्रतिनिधी)
अल्लाह आणि प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या पवित्र नावाने दारोदारी मागितलेली भीक आणि सदुभाऊ चौकात वडापावची गाडी चालवून जमवलेली आयुष्याची पुंजी...पण एका भामट्या टोळीने या गरिबांच्या तोंडाचा घास पळवला..! अकलूज आणि परिसरात "बुल कॅपिटल" नावाचा बनावट फंडा चालवून शेकडो निष्पाप नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घालणारा मुख्य सूत्रधार नदीम चौधरी आणि त्याची टोळी सध्या फरार झाली असून,या महाठगांना पोलीस कधी बेड्या ठोकणार? असा संतप्त सवाल अकलूजची जनता विचारत आहे...
पोटाला मारून साठवलेला पैसा हडपला..!
अकलूजच्या व्यंकटनगर येथील अत्यंत हलाखीत जीवन जगणाऱ्या गरीब फकीर कुटुंबाची या टोळीने लाखो रुपयांची फसवणूक केली असून हज यात्रा करून आलेला व धार्मिक आणि प्रामाणिकपणा दाखवणारा नदीम चौधरी प्रत्यक्षात मात्र मोठा "भामटा" निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.आपल्या कष्टाची कमाई आणि आयुष्यभराची पुंजी लुटली गेल्यानंतर या पीडित फकीर कुटुंबाने अत्यंत भावूक होत आपली आपबिती "राजधानी एक्सप्रेस" समोर मांडली आहे...
चौधरी गँगचा मास्टरमाईंड "फुफ्फा" कोण?
या महाघोटाळ्यात फक्त नदीम चौधरीच नाही,तर त्याच्या सोबत संपूर्ण टोळी सक्रिय होती.या रॅकेटमध्ये नदीम चौधरी (मुख्य सूत्रधार - सध्या कुटुंबासह फरार),फिरोज उर्फ फारूक बागवान उर्फ “फुफ्फा” (गँगचा मास्टरमाईंड),सलमान चौधरी,इम्रान चौधरी या भामट्यांनी मिळून अकलूज मधील शेकडो सामान्य आणि गरीब नागरिकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून "बुल कॅपिटल"च्या जाळ्यात ओढले आणि करोडो रुपये लंपास करून पोबारा केला...
पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान..!
गरीब,असहाय्य आणि कष्टाळू घटकांची फसवणूक करून फरार झालेल्या या चौधरी गँगचा शोध पोलीस कधी घेणार? गरिबांचे रक्त शोषणाऱ्या या भामट्यांच्या मुसक्या आवळून पीडित कुटुंबाला न्याय कधी मिळणार? की हे भामटे असेच पोलिसांना गुंगारा देत राहणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे...
"राजधानी एक्सप्रेस"चा थेट इशारा!
गरीब फकिरांचे अश्रू आणि सामान्य जनतेचा आक्रोश आता थांबणार नाही! "राजधानी एक्सप्रेस" या महा घोटाळ्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असून,या रॅकेटमधील प्रत्येक चेहऱ्याचा बुरखा टप्प्याटप्प्याने फाडला जाईल.प्रशासनाने आणि पोलिसांनी तातडीने पावले उचलून या टोळीला गजाआड करावे,हीच अकलूज आणि परिसरातील नागरिकांची एकमुखी मागणी आहे!

Comments
Post a Comment