⭕पुतण्यांच्या चेहऱ्यावर उमलला समाधानाचा आनंद...!⭕अकलूजच्या बाजार समितीत डाळिंबाला मिळालेल्या चांगल्या दरामुळे शेतकरी कुटुंब सुखावले...
राजधानी एक्सप्रेस
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी एक अत्यंत आनंददायी आणि मन हेलावून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले.आपल्या कष्टाच्या डाळिंबाला मिळालेला चांगला दर आणि हातात आलेली हक्काची रक्कम पाहून,आपल्या चुलत्या सोबत आलेल्या दोन चिमुकल्या पुतण्यांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद उपस्थितांची मात्र मने जिंकून गेला...
सध्या अकलूज मार्केट मध्ये फळांचा राजा मानल्या जाणाऱ्या डाळिंबाची मोठी आवक होत असून त्याला चांगला बाजारभाव मिळत आहे.याच दरम्यान,स्वप्नील गोडसे या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याने आपल्या शेतातील माल विक्रीसाठी आणला होता.मालाचा लिलाव झाल्यानंतर इम्रानभाई आणि राजूभाई यांच्या "एम एम फ्रूट कंपनी" मध्ये व्यापाऱ्यांकडून डाळिंब विक्रीची पट्टी आणि रोख रक्कम स्वीकारण्यासाठी ते गेले असता,त्यांच्या सोबत त्यांची दोन्ही लहानगी पुतणे सुद्धा उपस्थित होती...
आपल्या डाळिंबाचा मिळालेला भरघोस दर आणि व्यापाऱ्यांकडून मिळालेली रक्कम पाहून या चिमुकल्यांचा सुद्धा आनंद गगनात मावेनासा झाला होता,शेतात राबणाऱ्या आपल्या वडिलांचे आणि चुलत्याच्या कष्टाचे चीज झाल्याचे पाहून त्यांच्या निष्पाप चेहऱ्यावर उमललेले समाधान बाजार आवारात सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.शेतीतील अनिश्चिततेच्या काळात अशा सुखद प्रसंगाने संपूर्ण बाजार समितीत मात्र उत्साहाचे वातावरण निर्माण केले...
"राजधानी एक्सप्रेस"चे आमीर मोहोळकर यांनी या चिमुकल्यांचा हाच आनंद आणि मनमोहक क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला असून,हे दृश्य सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे...


Comments
Post a Comment