अकलूज येथे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; १५० खेळाडूंचा सहभाग.क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड यांच्या हस्ते उद्घाटनाने स्पर्धेचा प्रारंभ
Rajdhani Express News Network
अकलूज : जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर आणि सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सदाशिवराव माने विद्यालय येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. या स्पर्धेला जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे १५० हून अधिक खेळाडूंनी यात आपला सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या भव्य उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पूजन करून स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले, उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे तसेच क्रीडा प्रशिक्षक संजय राऊत, भीमाशंकर पाटील आणि भीमराव दुधाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
"वेटलिफ्टिंग हा शारीरिक सामर्थ्य, चिकाटी, सातत्य आणि कठोर शिस्तीची कसोटी पाहणारा खेळ आहे. या खेळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग अत्यंत समाधानाची बाब आहे. अशा जिल्हास्तरीय स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण गुणवत्तेला वाव मिळून पुढील स्तरावर चमकण्याची संधी प्राप्त होते," असे मत उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
विविध वयोगट व वजनगटानुसार पार पडलेल्या या स्पर्धेत खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आणि पालकांच्या उपस्थितीमुळे मैदानावरील वातावरण चैतन्यमय झाले होते.
क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना योग्य प्रसिद्धी देऊन खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या पत्रकारांच्या योगदानाचा गौरव करत, उद्घाटनप्रसंगी पत्रकार नौशाद मुलाणी व आमीर मोहोळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सदाशिवराव माने विद्यालयाच्या वतीने स्पर्धेचे अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक आयोजन करण्यात आले होते. या यशस्वी आयोजनामुळे अकलूज व परिसरातील क्रीडा वातावरणाला नवी चालना मिळाली आहे.

Comments
Post a Comment