⭕सुमारे १५० खेळाडूंचा सहभाग;जिल्हा क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड यांच्या हस्ते उद्घाटन...
⭕अकलूज येथे जिल्हा स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद...
राजधानी एक्सप्रेस
जिल्हा क्रीडा कार्यालय,सोलापूर आणि सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेला जिल्ह्यातील खेळाडूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला.बुधवार,दि.१६ सप्टेंबर रोजी सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या सुमारे १५० खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले...
स्पर्धेचा छोटेखानी उद्घाटन सोहळा जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी दत्तात्रय वरकड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला...
यावेळी सदाशिवराव माने विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले,उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे,पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे,सुजित कांबळे,तसेच क्रीडा प्रशिक्षक संजय राऊत,भीमाशंकर पाटील व भीमराव दुधाळ हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते...
वेटलिफ्टिंग हा खेळ केवळ शारीरिक सामर्थ्याचा नसून त्यात चिकाटी,सातत्य आणि शिस्तीची मोठी कसोटी लागते,अशा खेळात विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग अत्यंत कौतुकास्पद आहे.अशा जिल्हास्तरीय स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले सुप्त गुण दाखवण्याची व पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी मार्ग सुकर करण्याची मोठी संधी मिळते,असा सूर यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला...
याप्रसंगी क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना सातत्याने प्रसिद्धी देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या पत्रकार नौशाद मुलाणी व पत्रकार आमीर मोहोळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला...
खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात माध्यमांची भूमिका अत्यंत मोलाची असते,असे उद्गार उपस्थितांनी काढले...
स्पर्धेत विविध वयोगटांतील व वजनगटांतील मुला-मुलींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. उपस्थित क्रीडा शिक्षक,प्रशिक्षक आणि पालकांनी टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचे मनोबल वाढवले.सदाशिवराव माने विद्यालयाच्या वतीने या स्पर्धेचे अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते...
या यशस्वी आयोजनामुळे अकलूज परिसरातील क्रीडा वातावरणाला एक नवी ऊर्मी मिळाली आहे...

Comments
Post a Comment